बारामती:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक 9 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात मिट्टी को नमन, वीरों को वंदन' या घोषवाक्यासह देशभर आयोजित 'मेरी मिट्टी - मेरा देश' अर्थात 'माझी माती - माझा देश' या अभियानाची सुरुवात होत आहे. त्यानिमित्त सदर अभियाना अंतर्गत राज्यात विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत बारामती नगर परिषद कार्यालय चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पंचप्रण शपथ दि. ०९/०८/२०२३ रोजी घेतली.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2023 या कालावधी मधे बारामती नगर परिषदे मार्फत विविध उपक्रम राबवले जाणार असून. यामध्ये शहीद सैन्यदल, पोलीस व संरक्षण दलातील शहीद आणि स्वातंत्र्य सैनिक यांचे सन्मानार्थ शिलाफलक शारदा प्रांगण याठिकाणी बसवण्यात येणार आहेत. या शिलाफलकाचे अनावरण दि. १४/०८/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात येणार आहे. तसेच विशेष कार्यक्रम आयोजित करून, मातीचे दिवे हातात घेऊन पंचप्रण प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. या प्रसंगी राष्ट्रध्वजारोहण व राष्ट्रगान याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सूर्यनगरी या ठिकाणी अमृत वाटिका निर्माण करण्यात येत आहे. दि. ११/०८/२०२३ रोजी अमृत वाटिका मध्ये 75 देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार बारामती नगरपरिषद क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये व महाविद्यालयांमध्ये या अभियानातर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली.
आपल्या मातृभूमीसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूरवीरांप्रती आपल्या मनात असलेली अत्यंत आदराची व अभिमानाची भावना व्यक्त करण्यासाठी बारामती नगरपरिषदेच्या वतीने “मेरी माटी, मेरा देश” या अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या सर्वच कार्यक्रमांत देशभिमानी बारामती शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.
वसुधा वंदन कार्यक्रमातून वृक्ष लागवड
वसुधा वंदन उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड व वसुधा वंदन कार्यक्रमाकरीता एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्ष सौ सुनेत्रा वहिनी पवार व सर्व सदस्य यांच्या मार्फत वृक्ष लागवड करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असून बारामती नगर परिषदेच्या रोप वाटिका यांच्यामार्फत लागवडी साठी देशीवृक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अधिकारी-कर्मचारी घेणार पंचप्रण शपथ
लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग यामध्ये राहणार आहे. पंचप्रण, प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन, यांसारखे उपक्रम राबवले जात असून, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक बारामती शहरात उभारले जाणार आहेत.
असे असतील कार्यक्रम :
१ शिलाफलक उभारणी:
शारदा प्रांगण येथे शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे तसेच मातृभूमीचे स्वातंत्र्य आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता प्राणांची आहुती दिलेल्या शूर वीरांना अभिवादन कार्यक्रम.
२ वसुधा वंदन कार्यक्रमातून वृक्ष लागवड :
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने शहरातील सूर्यनगरी या ठिकाणी विविध देशी प्रजातीच्या ७५ रोपट्यांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे.
३ स्वातंत्र सैनिक व वीरांना वंदन :
बारामती नगर परिषद हद्दीतील ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केले अश्या संरक्षण दल, निम संरक्षण दल, पोलीस दलातील शहिदांच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा आजी/ माजी सैनिकांचा शाल श्रीफळ देवून पारंपारिक पद्धतीने यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
४ पंचप्रण शपथ घेणे:
मातीचे दिवे हातात घेऊन लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी कर्मचारी व नागरिक यांच्याकडून पंचप्रण प्रतिज्ञा ( शपथ ) घेण्यात येणार आहे
५ ध्वजारोहण कार्यक्रम :
दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता शारदा प्रांगण या ठिकाणी ध्वजारोहण राष्ट्रगीत गायन व कार्यक्रम घेण्यात येणार आहे सदर कार्यक्रमात सर्व नागरिक, युवक, सार्वजनिक मंडळे, महिला बचत गट, शाळा महाविद्यालय यांना सोबत घेवून हे अभियान यशस्वी करण्यात येणार आहे तसेच दि १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मागील वर्षी प्रमाणे घरोघरी हर घर तिरंगा हा उपक्रम राबववून राष्ट्रीय ध्वज फडकविणे बाबत जनतेला बारामती नगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment