प्रत्येक गुरुवारी नागरिकांच्या आरोग्यविषयक अडचणी सोडवल्या जाणार;बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रुग्ण सहाय्यता कक्ष कार्यान्वित.. - vadgrasta

Post Top Ad

Friday, September 1, 2023

प्रत्येक गुरुवारी नागरिकांच्या आरोग्यविषयक अडचणी सोडवल्या जाणार;बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रुग्ण सहाय्यता कक्ष कार्यान्वित..

प्रत्येक गुरुवारी नागरिकांच्या आरोग्यविषयक अडचणी सोडवल्या जाणार;बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रुग्ण सहाय्यता कक्ष कार्यान्वित..

बारामती :-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत झालेल्या नागरी सत्कारावेळी बारामतीत रुग्ण सहाय्यता कक्ष कार्यान्वित केली जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्यासंदर्भात पहिली बैठक गुरुवार दि. ३१ ऑगस्ट रोजी पार पडली. ना. अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी सुनिलकुमार मुसळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्येक गुरुवारी बारामतीत येवून याबाबत आढावा घेण्यासह नागरिकांच्या आरोग्यविषयक अडचणी सोडवणार आहेत. 
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांचा बारामतीत नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना बारामती आणि परिसरातील रुग्णांसाठी बारामतीत रुग्ण सहाय्यता कक्ष कार्यान्वित केला जाणार असल्याची घोषणा ना. पवार यांनी केली होती. त्यानुसार बारामतीत रुग्ण सहाय्यता कक्ष कार्यान्वित झाला आहे. त्यानुसार आता बारामती व परिसरातील रुग्णांच्या आरोग्यविषयक अडचणी सोडवल्या जाणार आहेत. 
शुक्रवारी बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालये याचा आढावा घेण्यात आला. याचवेळी वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य मित्र आणि निवासी वैद्यकीय अधिकारी यांचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना उपचाराबाबत मार्गदर्शन व प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी सुनीलकुमार मुसळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल शिंदे, महिला रुग्णालयांचे डॉ. बापू भोई, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयांचे डॉ. महेश जगताप, कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत आष्टीकर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या समन्वयक डॉ. प्रीती लोखंडे यांच्यासह विविध योजनांमधील रुग्णालयातील प्रतिनिधी उपस्थित होते. 

*रुग्ण सहाय्यता कक्षाचे अधिकारी दर गुरुवारी बारामतीत*
अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील कुटुंबीयांना सध्याच्या जीवनशैलीमुळे असंख्य रोगांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची आयुष्यमान भारत व राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रित करून ५ लाख रुपयांच्या आरोग्य विम्याचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. यांचा अधिकाधिक रुग्णांना लाभ मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी सुनीलकुमार मुसळे, जिल्हा समन्वयक डॉ. प्रीती लोखंडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत आष्टीकर यांच्यासह विविध आरोग्य योजनांशी संबंधित अधिकारी दर गुरुवारी बारामतीत असणार आहेत.

No comments:

Post a Comment