मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या
विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी माळेगावात कडकडीत बंद व रास्ता रोको आंदोलन..
बारामती:-बारामती तालुक्यातील माळेगाव याठिकाणी नुकत्याच काही दिवसांपूर्वी अमानुष मारहाण करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दौंड व बारामती येथील अधिकारी व हप्ता वसुल करणाऱ्या खासगी एजंट विरोधात गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी समस्त गोपाळ समाज बांधवांनी माळेगावात कडकडीत बंद ठेवला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी तब्बल दोन तासांहून अधिक वेळ निरा-बारामती राज्यमार्ग आंदोलकांनी रोखून धरला.
माळेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग दौंड व बारामती येथील अधिकारी व हप्ता वसुली करणाऱ्या खासगी एजंटने अवैध धंद्यावर धाड टाकताना एका गरोदर महिलेसह इतर लोकांना अमानुष मारहाण केली. मात्र, आठ दिवस उलटले
तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने सदर गुन्हा दाखल होण्यासाठी समस्त गोपाळ समाजाने माळेगाव बंद पाळला. तसेच निरा- बारामती राज्यमार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलिस ठाणे असा मोर्चा काढण्यात आला. पोलिस ठाण्या लगत निरा- बारामती राज्यमार्ग रोखून धरत निषेध सभा झाली. यावेळी
कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र टिंगरे, ऍड शाम कोकरे, ऍड दिलिप गि-हे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी
माजी सरपंच जयदीप तावरे, माजी उपसरपंच अजित तांबोळी, अशोकराव सस्ते, प्रमोद तावरे यांच्यासह गोपाळ समाजातील पिंटु गव्हाणे, युवराज धनगर, जनार्दन धनगर,संदीप गव्हाणे आदी उपस्थित होते.या आंदोलनातील महत्त्वाचे म्हणजे अमानुषपणे मारहाण झालेली गरोदर महिला प्रियंका पवार व मंदा जनार्दन धनगर यांच्यासह गोपाळ समाजातील महिलांनी न्यायासाठी जोरदार केलेला आक्रोषामुळे
घटनेबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ रास्ता रोको केल्याने दोन्ही बाजूला एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच आंदोलक निषेधाच्या घोषणा देत न्याय द्या, अशी मागणी करत होते, सदर घटनेची सत्यता पडताळून या घटनेची संपूर्ण व सखोल चौकशी करून तो अहवाल वरिष्ठांना देण्यात येईल.वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. या घटनेतील दोषींची गय केली जाणार नाही असे गणेश इंगळे - उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती यांनी यावेळी सांगितले.तर सदर घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास पोलिस चालढकल का करीत आहेत. दोषींवर गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा रंजन तावरे - माजी अध्यक्ष माळेगाव कारखाना यांनी दिला तर एक्साईजचे अधिकाऱ्यांची अवैध धंदेवाल्यांशी व्यावसायिक भागिदारी आहे. त्यांनी पैसे घेतल्याचे पुरावे आहेत, अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मच्छिंद्र टिंगरे यांनी केली.
No comments:
Post a Comment