महाविकास आघाडीच्या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ला उद्यापासून प्रारंभ-शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा
पुणे : महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ची तयारी पूर्ण झाली असून उद्या (दि. २७) जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. खासदार शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाची सांगता होणार आहे.
संसद महारत्न खासदार सुप्रिया सुळे आणि संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. कोल्हे यांनी 'शेतकरी आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवणे आणि निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान, बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा, पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून तातडीने नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित 'शैक्षणिक कर्ज ' धोरण लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी हा एल्गार पुकारला असून २७ ते ३० डिसेंबर दरम्यान भव्य 'शेतकरी आक्रोश मोर्चा' आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार सुळे आणि अमोल कोल्हे यांनी दिली.
उद्या ( दि. २७) सकाळी ८ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून ओतूर येथे पदयात्रा व कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आळेफाटा येथे कोपरा सभा व नारायणगाव येथे एस.टी. स्टँडजवळ पदयात्रा होणार असून ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून या आक्रोश मोर्चाचे स्वागत केले जाणार आहे. दुपारी ३ वाजता कळंब येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोपरा सभा आणि मंचर बाजार समिती येथून पदयात्रेने लक्ष्मी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठी सभा होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता राजगुरुनगर बाजार समिती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ सभा आणि त्यानंतर राजगुरुनगर एस.टी. स्टँड येथील हुतात्मा राजगुरू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पाबळ चौकातून वाहनांद्वारे हा मोर्चा चाकणकडे रवाना होईल. चाकण बाजार समिती प्रवेशद्वारापासून रात्री ८ वाजता काढण्यात येणाऱ्या पदयात्रेचा समारोप बाजारपेठेतून एस.टी.स्टँड, तळेगाव चौक येथे होईल. त्यानंतर चौफुला, करंदी मार्गे केंदूर येथे मोर्चाचा पहिला मुक्काम होईल, असे त्यांनी सांगितले.
गुरुवारी (दि. २८) सकाळी केंदूर येथील श्रीराम चौकात सभा आयोजित करण्यात आली असून पाबळ येथील लोणी चौकात कोपरा सभा होईल. त्यानंतर धामारी, मुखी, जातेगाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वागत केल्यानंतर दुपारी दीड वाजता शिक्रापूर येथे पाबळ चौक ते चाकण चौक अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता तळेगाव ढमढेरे येथील सावता माळी सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर टाकळीभीमा, पारोडी, दहीवडी, उरळगाव मार्गे न्हावरा येथे हा मोर्चा येईल. न्हावरा येथे तळेगाव फाटा ते निर्विदरम्यान पदयात्रा आणि पुढे निर्वि, कोळगाव डोळस, कुरुळी, वडगाव रासाई मार्गे मांडवगण फराटा येथे आल्यानंतर या ठिकाणी सभा होईल आणि पुढे तांदळी, काष्टी मार्गे दौंड येथे मुक्काम, असे नियोजन करण्यात आल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी (दि. २९) सकाळी नऊ वाजता दौंड येथील महात्मा फुले पुतळा ते आंबेडकर चौक, गांधी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान पदयात्रा काढण्यात येणार असून त्यानंतर मोर्चा कुरकुंभ, मळद, रावणगाव मार्गे खडकी येथे येईल. याठिकाणी बारामती चौकातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मोर्चाचे रुपांतर सभेत होईल. त्यानंतर भिगवण आणि पळसदेव येथे कोपरा सभा करुन दुपारी अडीच वाजता मोर्चा इंदापूर येथे येईल. इंदापूर येथे पदयात्रा झाल्यानंतर निमगाव केतकी येथे कोपरा सभा, आणि तेथून मसाळवाडी, काटेवाडी, लिमटेक, पिंपळी, बांदलवाडी मार्गे मोर्चा बारामती येथे आल्यानंतर नगरपालिकेसमोर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर बारामती येथे मुक्काम होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
शनिवारी (दि. ३०) बारामती येथून मेडद, कऱ्हावागज, जळगाव, माळवाडी, तारडोळी मार्गे मोरगाव येथे मोर्चा आल्यावर मयुरेश्वराचे दर्शन घेऊन मंदिरासमोर कोपरा सभा होईल. त्यानंतर आंबी बु. मार्गे जेजुरी येथे कोपरा सभा होऊन मोर्चा शिंदवणे मार्गे हवेली तालुक्यात प्रवेश करेल. शिंदवणे येथे स्वागत स्वीकारुन उरळीकांचनला रवाना होईल. या ठिकाणी जुन्या इलाईट हॉटेलसमोर कोपरा सभा होणार असून सोरतापवाडी फाटा, कुंजीरवाडी फाटा, थेऊर फाटा मार्गे लोणी काळभोर येथे आल्यावर रेल्वे स्टेशनजवळ कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोणी काळभोर येथून कवडीपाट टोलनाका मार्गे मांजरी फार्म, शेवाळवाडी फाटा, १५ नंबर, हडपसर गाडीतळ मार्गे पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सभा होणार असून खासदार शरद पवार, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या न्याय्य मागण्यांसाठी काढण्यात येत असलेल्या या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'त शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केले असून पुण्यातील सभेला उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा संदेश द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment