पुणे ग्रामीण डाक विभागातर्फे टपाल जीवन विमाच्या 140 व्या वर्धापनानिमित्त विशेष मोहीम
पुणे:-भारत सरकारने 1884 मध्ये एका योजनेअंतर्गत पोस्टल लाइफ इन्शुरन्स (Postal Life Insurance) योजना सुरू केली होती. या योजनेला यावर्षी 140 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पुणे ग्रामीण डाक विभागातर्फे दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी 140 व्या वर्धापन दिनानिमित विशेष मोहीम राबविली जाणार आहे. त्या दिवशी विभागातील सर्व डाकघरांतून प्रत्येक घर, शासकीय/निमशासकीय/खाजगी कार्यालय/संस्था यांना प्रत्यक्ष भेटी देवून व्यक्तिगत संपर्क साधून टपाल जीवन विम्याचे महत्व सांगितल्या जाणार असून जास्तीत जास्त लोकांना टपाल जीवन विमाच्या कक्षेत आणण्यात येणार आहे.सुरुवातीला डाक विभागातील कर्मचारी यांच्यासाठी मर्यादित असणा-या डाक विम्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा या उद्देशाने भारत सरकारने या योजनेमध्ये बदल केले असून त्यानुसार आता या योजनेत केंद्र सरकारचे कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, देशसेवा करणारे सैनिक, निमलष्करी दल, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी, सरकारी शैक्षणिक संस्थांचे शिक्षक आणि कर्मचारी,नगरपालिका, जिल्हा परिषद, राष्ट्रीयकृत बँका, मान्यताप्राप्त विद्यापीठे यांचे कर्मचारी तसेच डॉक्टर,वकील,अभियंते,चार्टर्ड अकौंटंट यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. तसेच पदवीधारक व पदविका धारक यांना सुद्धा आता पोस्ट ऑफिसचा टपाल जीवन विम्याच्या कक्षेत समावेश करण्यात आलेला आहे.टपाल जीवन विमा हा आपल्या `कमी प्रीमियम उच्च बोनस' या विशेषतेसाठी प्रसिद्ध आहे.टपाल जीवन विमा अंतर्गत संतोष, सुरक्षा, सुविधा, सुमंगल, युगल सुरक्षा व बाल जीवन विमा इत्यादी विमा योजना उपलब्ध आहेत. सदर योजना भारत सरकार तर्फे राबविल्या जात असल्यामुळे विश्वासार्ह असून सर्वात जुनी विमा योजना आहे.प्रत्येक गावामध्ये पोस्ट ऑफिस ची सुविधा असल्यामुळे नागरिक टपाल जीवन विमा उघडु शकतात आणि हफ्ता भरू शकतात. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या मोबाईल अॅप द्वारे ऑनलाईन प्रीमियम भरता येऊ शकतो. तसेच पाँलीसी चा क्लेम कुठल्याही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये घेऊ शकता. तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक श्री बा.पो. एरंडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment