बार्टीला 400 कोटी रुपये अनुदान द्या - सम्यक विद्यार्थी आंदोलनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे - 13 मार्च 2024
बार्टीची 2020 ते 2024 पर्यंतची फेलोशिप वितरीत न केल्यामुळे आणि स्पर्धा परीक्षा क्लासेस, समतादूत, स्कील डेव्हलपमेंट, शिष्यवृत्ती, फेलोशिप व नेट साठी निधी कमी पडत असल्याने वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सल्लागार समितीच्या अध्यक्षा अंजलीताई आंबेडकर सदस्य महेश भारतीय सर यांच्या नेतृत्वात राज्यभर आंदोलने करण्यात आली. याच धरतीवर पुणे शहर व जिल्हा कार्यकारिणीने पुणे जिल्हा अधिकारी यांची भेट घेवून त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.
महाराष्ट्रातील फुले - शाहू आंबेडकर विचारधारेच्या संस्था, संघटना, पक्ष यांच्या रेट्यामुळे ओबीसी समूहासाठी 'महाज्योती', मराठा समूहासाठी 'सारथी' ची निर्मिती करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अनेक प्रयत्नामुळे आणि आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने बार्टीच्या धर्तीवर 'सारथी' आणि 'महाज्योती' ची निर्मिती केली. बार्टी या संस्थांची मातृसंस्था आहे. परंतु आरक्षित वर्गाच्या लाभार्थ्यांमध्ये सरकार आता दुजाभाव करीत आहे.
महाराष्ट्र शासनाने 'सारथी' आणि 'महाज्योती' या संस्थांना 365 कोटी रुपये दिले आणि बार्टीला फक्त 75 कोटी रुपये देण्यात आले आहेत. हा जो आरक्षित वर्गाच्या लाभार्थ्यांमध्ये महाराष्ट्र शासन दुजाभाव करीत आहे, तो भारतीय राज्य घटनेच्या मार्गदर्शक तत्वांची पायमल्ली आहे.
सारथी, महाज्योती च्या निर्मितीसाठी ज्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. त्याच मुलांची सर्वांगीण वाढ रोखण्याचे काम बजेट मध्ये कपात करून शासन करीत आहे. आरक्षित वर्गाच्या लाभार्थ्यांमध्ये भांडणे लावण्यापेक्षा बार्टीला वाढीव निधी म्हणून 400 कोटी रुपये देऊन, हा भेदभाव महाराष्ट्र शासनाने संपवावा अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. अशी माहिती सम्यकचे रोहित भोसले यांनी दिली.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पुणे जिल्हा निरीक्षक अक्षय गोटेगावकर, अ.नगर जिल्हा निरीक्षक राहुल जगताप, सातारा जिल्हा निरीक्षक रोहित भोसले, शहरध्यक्ष चैतन्य इंगळे, मा.जिल्हा उपाध्यक्ष विकी अवचार, फर्ग्युसन कॉलेज अध्यक्ष स्नेहा इंगोले, महासचिव रोहन वाघमारे, YCLC निरीक्षक बुद्धप्रिया जगताप, प्रणिती क्षिरसागर तसेच आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment