कवी कवितेतून तर पत्रकार बातमीतून समाजाचे प्रश्न मांडतात : वसंत मुंडे
दैनिक आधुनिक केसरी व एऑन प्ले आयोजित 'महाराष्ट्राचा महाकवी-2024'चे पुरस्कार वितरण व कविसंमेलनास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर :( प्रतिनिधी)
कवीची कोणतीही रचना कमी-अधिक नसते. ते आपले विचार उत्कटपणे कवितेतून मांडत असतात. कवी आणि पत्रकार यांचे खूप जवळचे नाते आहे, कवी कवितेतून तर पत्रकार बातमीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मांडत असताे. लोकशाहीचा चौथा खांब असलेली वृत्तपत्र जेव्हा खरं लिहिण्यासाठी कचरतील तेव्हा कवींनी सर्वसामान्यांच्या भावनांचा जोर आपल्या शब्दांमध्ये भरून कविता मांडली पाहिजे. असे स्पष्ट करून कविता लिहिणारे खूप झालेत पण ऐकणाऱ्याची संख्या या सोशल मीडियाच्या युगात कमी होत चालली आहे, असा माझा समज होता. पण तो मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रोता वर्गामुळे खोटा ठरविला, कवितेला खूप चांगले दिवस येताहेत ही खूप सकारात्मक गोष्ट आहे, असा आशावाद महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजी नगर येथे विश्वव्यापी मराठी दैनिक आधुनिक केसरी यू-ट्यूब चॅनल व एऑन प्ले आयोजित 'महाराष्ट्राचा महाकवी -2024' या आनलाईन काव्यवाचन स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा गुरूवार 28 मार्च रोजी कुलस्वामिनी मंगल कार्यालयात संपन्न झाला. तसेच स्पर्धेतील सहभागी कवींना सन्मानपत्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव, यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी एऑन प्लेचे डायरेक्टर डॉ. अतुल नाईक, कवयित्री संजीवनी तडेगावकर आणि महाराष्ट्राचा महाकवी ही स्पर्धा जिंकणारे विजेते नामदेवराव चोथे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना वसंत मुंडे म्हणाले, मी महाविद्यालयीनत असताना सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांची 'काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता' ही कविता स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात ऐकली आणि या कवितेने व भालेराव सरांनी मला भारावून टाकले. यावेळी कवी प्रकाश घोडके हेही उपस्थित हाेते. त्यांची 'तीच्या दारावून जाताना' ही कविताही खूप गाजली होती. असे सांगत वसंत मुंडे यांनी मराठी कवितेचे महत्त्व सांगताना वेगवेगळी उदाहरणे देऊन भाष्य केले. इंद्रजीत भालेराव यांच्या दोन कवितांचे कडवेही त्यांनी सादर केले. कविता जगण्यास बळ देते यांचे मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर इथे बसलेले आहे. नामदेव चोथे इतके वयोवृद्ध असून त्यांच्या लेखणीच्या जोरावर आज महाराष्ट्राचे महाकवी हा मान मिळवतात ही खरंच खूप कौतुकास्पद बाब आहे. ते सर्व कवींसाठी एक मॉडेल रोल आहेत, असे उद्गार त्यांनी काढले. 'ती आली आणि ती गेली' या दोघांमधील अंतरातूनच कवी चा जन्म होतो. व्यवस्थे विरूद्ध उघडपणे बोलण्याची हिंमत कवीमध्ये असली पाहिजे. लोकशाहीचा चौथा खांब असलेली वृत्तपत्र जेव्हा खरं लिहिण्यासाठी कचरतील तेव्हा कवींनी सर्वसामान्यांच्या भावनांचा जोर आपल्या शब्दांमध्ये भरून कविता मांडली पाहिजे.
मराठा वाड्याच्या मातीतून अनेक दिग्गज कवी घडले आहेत, येथील मातीला विविध प्रकारच्या साहित्यिकांची खूप मोठी देणगी मिळाली आहे. अनेक संस्कृत व उर्दू शेरो शायरीतून वसंत मुंडे यांनी कवितेची ताकद काय असते हे विषद केले.
यावेळी बोलताना इंद्रजीत भालेराव म्हणाले की, कविता म्हणजे उत्कटपणे व्यक्त होण्याचे साधन आहे. कवीने उत्कटपणे कविता लिहिली तर ती नक्कीच वाचकांच्या हृदयापर्यंत जाते. कवींनी कविता लिहिताना ती कुणाला आवडेल का? याचा विचार न करता आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त कराव्यात, असे आवाहन सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी केले.
इंद्रजीत भालेराव पुढे म्हणाले की, दैनिक आधुनिक केसरीने कविता, साहित्य प्राधान्यक्रमाने प्रकाशित करून लेखक, कवींना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, हे मी मागील काही वर्षांपासून बघतो आहे. माझे अनेक विद्यार्थी या दैनिकात लिहीत आहेत, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आज दैनिकांमधून साहित्य लुप्त होत चालले असताना आधुनिक केसरी साहित्याला प्राधान्य देते आहे, ही खूप कौतुकास्पद बाब आहे.
दीपप्रज्वलनाने या सोहळ्याचा शुभारंभ झाल्यानंतर मान्यवरांचे दैनिक आधुनिक केसरी व एऑन प्लेच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक आधुनिक केसरीचे मुख्य संपादक डॉ. प्रभू गोरे यांनी केले. तसेच या वेळी प्रसिद्ध कवयित्री डाॅ. संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेत कवी, प्राध्यापक विजय पोहनेरकर, कवी विनोद जैतमहाल, कवयित्री कस्तुरी कुलकर्णी, कवी प्रशांत मुळे यांच्यासह स्पर्धेतील उत्कृष्ट कवींचे कविसंमेलन झाले. सुहास पोतदार यांनी या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment