देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे;मूळ संकल्पना पुण्याची; पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कमी मतदान असलेल्या शहरांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांत मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून असा उपक्रम देशात प्रथमच राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची मूळ संकल्पना पुणे जिल्ह्याची असून पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदार संघाची अधिसूचना १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे तर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल २०२४ अशी आहे. बारामती मतदार संघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ एप्रिल आहे. पुणे, शिरुर आणि मावळ मतदार संघांची अधिसूचना प्रसिद्धी १८ एप्रिल रोजी, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत २५ एप्रिल तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल २०२४ अशी आहे.
आजपर्यंत पुणे जिल्ह्यात ४३ लाख २८ हजार ९५४ पुरूष, ३९ लाख ६३ हजार २६९ स्त्री तर ७२८ तृतीयपंथी अशा एकूण ८२ लाख ९२ हजार ९५१ मतदारांची नोंद झाली आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. ६, आणि स्थलांतरणासाठी अर्ज क्र. ८ सादर करण्याची अद्यापही संधी असून बारामती मतदार संघात ९ एप्रिलपर्यंत तर अन्य तीन मतदार संघात १५ एप्रिलपर्यंत आलेल्या अर्जांवर निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे. अंतिम मतदारसंख्या त्यावेळी निश्चित होईल.
सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ५ किंवा ५ पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेल्या इमारतीमध्ये वाहनतळाची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पाळणाघर, स्त्रीयांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह आदी ठळक सुविधांसह अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी शहरी भागात प्रत्येक वॉर्ड कार्यालयात मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट वितरणाचे कामकाज कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले आहे.
मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात तर शिरूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव (कोरेगाव) औद्यागिक वसाहतीतील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्राची प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अग्नीशमन यंत्रणा आदी विभागांनी सुरक्षतेच्यादृष्टिने संयुक्त पाहणी केली आहे.
प्रत्येक विधानसभा मतदार संघात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणूकीच्या कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment