बारामतीत अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी दलालासह डॉक्टरावर गुन्हा दाखल..
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली.
डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे हे काही दलांलामार्फत चारचाकी गाडीत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन गर्भलिंग निदान करीत असल्याबाबतची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे प्राप्त झालेली होती. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. यमपल्ले यांनी शिक्रापूर, यवत, दौंड, इंदापूर व बारामती येथील वैद्यकीय अधिक्षकांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे यांचे समुचित अधिकारी डॉ. महेश जगताप आणि शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक युवराज बोडके यांनी सापळा रचून दोन इसमांना पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रासहित पकडले. दोन्ही इसमाची विचारपूस केली असता त्यांनी डॉ. शिंदे यांनी दलाल नितिन बाळासाहेब घुले यांच्या मदतीने मौजे माळेगाव येथे एका महिलेचे अवैधरित्या गर्भलिंग चाचणी केल्याचे सांगितले. या प्रकरणी माळेगाव पोलिस स्टेशन येथे डॉ. जगताप यांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कार्यवाही आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बालाजी भांगे करीत आहेत, अशी माहिती डॉ. यमपल्ले यांनी दिली.
No comments:
Post a Comment