*राज्यातील पत्रकारांच्या एकीच्या शक्तीचे दर्शन सरकारला घडेल - वसंत मुंडे*
*दिक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेला 28 जुलैपासून प्रारंभ*
बीड (प्रतिनिधी):-केंद्र आणि राज्य सरकारची एकूण धोरणे लक्षात घेता जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील छोटी वृत्तपत्रे आणि पत्रकार ही व्यवस्था कमजोर करण्याचीच राहिली आहेत. समाजातील विविध व्यावसायीक, नोकरदार, तरूण, महिला या घटकांना न्याय देताना पत्रकारांच्या मागण्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. सरकार मतपेढीचा विचार करून हजारो कोटींच्या घोषणा करते. मात्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार्या पत्रकारांचेच प्रश्न पाठपुरावा करूनही सुटत नाहीत. पत्रकारही समाजातील प्रमुख घटक आहेत. याची आठवण करून देण्यासाठी संवाद यात्रा होणार आहे. संवाद ही नैसर्गिक प्रक्रिया असून ती थेट वैयक्तीक आणि संस्थात्मक परिवर्तन घडवते. यात्रा पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्यासाठी आणि पत्रकारांना समजुन घेण्यासाठी संधी प्रदान करणार आहे. रविवार दि.28 जुलै रोजी नागपूरच्या दिक्षाभूमीतून यात्रेचा शुभारंभ होणार असुन यात्रेचा समारोप मुंबई मंत्रालय येथे होणार आहे असे पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बीड येथील हॉटेल निलकमल येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, लोकशाहीच्या बळकटीसाटी काढण्यात येणार्या दिक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा संदर्भात पत्रकार परिषद घेवून सविस्तर माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संपादक राजेंद्र आगवान,ज्येष्ठ संपादक सुनील क्षीरसागर,पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानूरकर, संपादक संघाचे अध्यक्ष नरेंद्र कांकरिया,ज्येष्ठ पत्रकार महेश वाघमारे,ज्येष्ठ फोटोग्राफर विश्वनाथ माणूसमारे, लोकपत्रकार भागवत तावरे, संजय मालानी, बालाजी मारगुडे, दिनेश लिंबेकर,शेखर कुमार,वैभव स्वामी यांची प्रमुख उपस्थिती व्यासपीठावर होती. यावेळी पत्रकार संवाद यात्रे संदर्भात अधिक माहिती देताना पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले की, भारतीय लोकशाहीत वृत्तपत्र, पत्रकार आणि प्रसारमाध्यमात काम करणारे प्रतिनिधी हा चौथा स्तंभ मानला जातो. पण समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव आणि केंद्र व राज्य सरकारची एकूण धोरणे लक्षात घेता जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील प्रसारमाध्यम व्यवस्था कमजोर करण्याचेच प्रयत्न होत आहेत. वैयक्तीक संघटनेच्या माध्यमातून माध्यम क्षेत्रातील निर्माण झालेले प्रश्न सातत्याने सरकारी व्यवस्थेसमोर मांडून पाठपुरावा केल्यानंतरही या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली जाते. कोरोना महामारीनंतर वृत्तपत्र व्यवसाय अडचणीत आला आहे. सरकारने अनेक क्षेत्रांना मदत केली पण वृत्तपत्र क्षेत्राला मदत केली नाही. कोरोनात दिडशेपेक्षा अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला. घोषणा करूनही सरकारने मदत केली नाही. जाहिरातीवरील करापासून ते छपाईच्या कागदापर्यंत आणि पत्रकारांच्या अधिस्विकृतीपासून ते पेन्शन योजनेपर्यंत सातत्याने निवेदने, पाठपुरावा केल्यानंतरही शासन गांभिर्याने विषय समजून घेत नाही. मात्र मतपेटीचा विचार करून विविध घटकांना हजारो कोटी रूपयांच्या योजना दिल्या जातात. या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार्या घटकाला मात्र वंचित ठेवले जात आहे. पत्रकारही प्रमुख घटक आहे, तो ही मतदार आहे याची आठवण करून देण्यासाठी आणि शांततेच्या संवाद मार्गाने सरकारला पत्रकारांचे प्रश्न सांगण्यासाठी ही यात्रा आहे. राजकीय व्यवस्थेवर अंकुश आणि समाजाचे प्रश्न मांडणार्या घटकाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यात्रा काढावी लागत आहे हे दुर्देव. लोकशाहीत स्थानिक पातळीवरील पत्रकार ही व्यवस्था सक्षम राहिली तरच सामान्य माणसाचा आवाज बुलंद राहिल आणि व्यवस्थेवर अंकुश राखता येईल. यासाठी समाजातील विविध घटकांनीही पत्रकारांच्या मागण्यांसाठी पाठींबा द्यावा ही अपेक्षा आहे. दि.28 जुलै 2024 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिक्षाभूमी नागपूर येथून यात्रेचा शुभारंभ होईल. नागपूर, खान्देश आणि उत्तर महाराष्ट्र या तीन विभागातील जिल्हे आणि तालुक्यातून ही यात्रा शिर्डी येथे 3 ऑगस्ट रोजी येणार आहे. यात्रे दरम्यान प्रत्येक जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधून त्या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, साहित्यीक यांचा पाठींबा घेण्याचा प्रयत्न होणार आहे. दुसर्या टप्यात छत्रपती संभाजीनगर येथून यात्रेला सुरूवात होवून बीड, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सातारा, बारामती, पुणे या मार्गे दि.20 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंट्रलमध्ये यात्रेचा समारोप होईल. यात्रेत हजारोंच्या संख्येने पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते आणि पत्रकारप्रेमी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. सरकाने पत्रकारांचा विषय गांभिर्याने घेवून चर्चा करून न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आहे. यासाठी पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच निघणार्या या संवाद यात्रेत सर्वांनी सहभागी होवून आपल्या एकीच्या शक्तीचे दर्शन सरकारला द्यावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
मान्यवरांच्या हस्ते पोस्टर प्रकाशन
पत्रकारांच्या विविध न्याय मागण्यांसाठी सर्व पत्रकारांना सोबत घेवून विविध राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील विचारवंत, नामवंत यांचा पाठींबा घेत नागपूर दिक्षाभूमी ते मंत्रालय मुंबई अशी पत्रकार संवाद यात्रा राज्याच्याच नव्हे तर कदाचित देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निघणार असल्याने इतिहास घडणार आहे. यावेळी यात्रा पोस्टरचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कै.पत्रकार सुधाकर सोनवणे यांच्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत
परखड आणि सडेतोड लिखाण करणारे पत्रकार सुधाकर सोनवणे यांचे कर्करोगाने अल्पवयात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दोन लहान मुले, पत्नी यांच्यापुढे जगावे कसे? असा मोठा प्रश्न आर्थिक अडचणीमुळे निर्माण झालेला आहे. या कुटुंबीयांना आधार म्हणून पत्रकार संघाच्या वतीने रोख दहा हजार रुपयाची मदत यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर सोनवणे यांच्या कुटुंबीयांना दानशूरांनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. दानशूरांनी सोनवणे कुटुंबीयांना मदत करण्यासाठी मयत सुधाकर सोनवणे यांच्या धर्मपत्नी तत्त्वशीला सुधाकर सोनवणे यांच्या 95 61 25 92 67 या नंबरवर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment