*लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे-
वसंत मुंडे; अमरावती येथे पत्रकार संवाद रॅलीचे जागोजाग स्वागत..*
अमरावती(प्रतिनिधी) : - महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची संवाद रॅली सोमवारी (दि.29) दुपारी अमरावती येथे पोहोचली. सेवाग्राम (वर्धा) ते अमरावती दरम्यान रॅलीचे स्थानिक पत्रकारांनी जागोजाग जंगी स्वागत केले. दरम्यान अमरावती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे. कारण कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका वर्तमानपत्रांना बसला आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली वर्तमानपत्रे कमकुवत बनत असल्याने पत्रकारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या साऱ्या परिस्थितीत लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची संवाद यात्रा रविवारी (दि.28) दीक्षाभूमी येथून सेवाग्रामच्या दिशेने परवाना झाली. सेवाग्राम येथे संवाद रॅलीत सहभागी झालेल्या राज्यभरातील पत्रकारांचे स्थानिक पत्रकारांनी उत्स्फूर्त स्वागत केले. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सेवाग्राम येथेही रॅलीचे स्वागत झाले. दरम्यान, सोमवारी (दि.29) सेवाग्राम येथून पत्रकार संवाद रॅली अमरावतीच्या दिशेने निघाली. वाटेत चांदुर रेल्वे येथे रॅलीचे फटाके फोडून स्वागत झाले. यानंतर बुद्ध टेकडी येथे सकाळपासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक पत्रकारांनी प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे व पदाधिकाऱ्यांचे स्वागत आणि सत्कार केला. या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर अमरावती येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पत्रकारांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले, कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका जर कोणाला बसला असेल तर तो वर्तमानपत्र आणि पत्रकारांना बसला आहे. अनेक वर्तमानपत्रांच्या आवरत्या बंद झाल्या. हजारो पत्रकारांची नोकरी गेली. कोरोना महामारी पत्रकार फ्रंट लाईनला असलेल्या पोलिस वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने काम करत होते. शासनाने कर्मचाऱ्यांसाठी 50 लाखाचे विभाग कवच दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकारांनाही विमा सुरक्षा देण्याची मागणी केली. सदरील मागणी मान्य ही झाली. परंतु पुढे काय झाले माहित नाही. दीडशेहून अधिक पत्रकारांचा फ्रंट लाईनला काम करत असताना मृत्यू झाला. यापैकी एकाही पत्रकाराला विमा मिळाला नाही. या साऱ्या परिस्थितीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली लहान- मोठी सर्वच वर्तमानपत्रे सक्षम झाली पाहिजेत. वर्तमानपत्रे सक्षम झाली तर लोकशाहीचे देखील बळकटीकरण होणार आहे. वर्तमानपत्र आणि पत्रकारांना सक्षम म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत आणि खंबीर बनवण्यासाठीच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने संवाद रॅली काढली असल्याचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले.
यावेळी सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रवीण सपकाळे, राज्य समन्वयक संतोष मानुरकर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी तसेच स्थानिकचे पत्रकार प्रवीण शेगोकार, नयन मोंढे, अजय शृंगारे, अर्चना रक्षे, अनिरुद्ध उगले, अमित अग्रवाल, शेषनाग गजभिये, पुष्पा जैन, अली असगर दवावाला, गजानन खोपे, राजा वानखेडे, मनीष भंकाळे, मनीष गुडदे यांच्यासह स्थानिक पत्रकार उपस्थित होते.
चौकट...
*अधिस्वीकृतीच्या अटी शिथिल करा*
पत्रकार परिषदेत बोलताना वसंत मुंडे म्हणाले, अधिकृती समितीचा विभागीय अध्यक्ष असताना मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेतल्या. शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक पत्रकारांना अधिक स्वीकृती मिळवून दिली. परंतु आधी स्वीकृतीची खरी गरज ग्रामीण भागातील पत्रकारांना आहे. प्रत्येक पत्रकाराला अधिस्वीकृती मिळावी यासाठी शासनाने नियम आणि अटी येथील कराव्यात, असे वसंत मुंडे म्हणाले.
चौकट...
*वर्तमानपत्र वाचकांना आयकरात सूट द्या*
कोरोना महामारीनंतर सर्वच वर्तमानपत्रांचा खूप कमी झाला आहे. याचा फटका वर्तमानपत्र आणि त्यामध्ये काम करणारे पत्रकार व माध्यमकर्मी यांना बसला आहे. या परिस्थितीत वर्तमानपत्र आणि पर्यायाने पत्रकारांना सक्षम करण्यासाठी वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना प्रतिवर्षी पाच हजार रुपयांची सूट द्यावी. तसेच ग्रामीण भागातील वाचकांना आपल्या गावात पेपर वाचायला मिळावा यासाठी ग्रामपंचायतीनी वार्षिक आराखड्यात वर्तमानपत्र खरेदीसाठी दहा हजार रुपयांचा निधी राखीव ठेवावा. असे केले तरच पत्रकार सक्षम बनतील, असे वसंत मुंडे म्हणाले.
- - - - - -
No comments:
Post a Comment