*लोकशाहीचा डीएनए पत्रकार: वसंत मुंडे* विदर्भात सर्व स्तरातील लोकांचा संवाद यात्रेला प्रतिसाद आणि पाठिंबा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 30, 2024

*लोकशाहीचा डीएनए पत्रकार: वसंत मुंडे* विदर्भात सर्व स्तरातील लोकांचा संवाद यात्रेला प्रतिसाद आणि पाठिंबा..

*लोकशाहीचा डीएनए पत्रकार: वसंत मुंडे*
  विदर्भात सर्व स्तरातील लोकांचा संवाद यात्रेला प्रतिसाद आणि पाठिंबा..
 अकोला(प्रतिनिधी) :-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली. घटनेतच त्यांनी पत्रकार आणि माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे ठणकावून सांगितले. कारण महामानव बाबासाहेब हे घटना लिहिण्यापूर्वी पत्रकार होते. त्यांनी बहिष्कृत भारत नावाचे वर्तमानपत्र काढले. यामुळे पत्रकार हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा डीएनए आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. ते अकोला येथे मंगळवारी (दि.30) पत्रकार परिषदेत बोलत होते. 
     दीक्षाभूमीवरून निघालेली पत्रकार संवाद रॅली सेवाग्राम (वर्धा), अमरावती मार्गे मंगळवारी (दि.30) दुपारी 12 वाजता अकोला येथे पोहोचली. येथील विश्रामगृहावर प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची पत्रकार परिषद झाली.  यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पत्रकारांना संबोधित करताना वसंत मुंडे म्हणाले, कोरोना महामारीनंतर पत्रकारांची अवस्था ना घर का ना घाट का... अशी झाली आहे. वर्तमानपत्रांचा खप प्रचंड कमी झाल्याने दैनिकांचे मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आर्थिक गणित जुळत नसल्याने अनेक वर्तमानपत्रांनी विभागीय आवृत्या बंद केल्या. पत्रकारांसह कर्मचारी असलेल्या मीडिया कर्मींची संख्या कमी केली. यामुळे कोरोना महामारीनंतर हजारो पत्रकारांच्या नोकऱ्या जाऊन ते विस्थापित बनले आहेत. जे सक्रिय आहेत त्यांचे पगार कमी झाले आहेत. या साऱ्या परिस्थितीत वर्षानुवर्षापासून लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांचे स्वतःचे प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु लोकांचा आवाज बनवून त्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांना दुर्दैवाने स्वतःचे प्रश्न मांडता येत नाहीत. मांडले तरी राज्यकर्ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कारण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांच्या प्रश्नावर शासन दरबारी आवाज उठवून पाठपुरावा करत आहे. काही प्रश्न सोडवण्यात पत्रकार संघाला यश आले असले तरी महत्वाचे प्रश्न सुटलेले नाहीत, असे मुंडे म्हणाले. 
     पुढे बोलताना ते म्हणाले, अलीकडच्या काळात सरकार खूप उदार झालेले आहे. लाडकी बहीण पासून विद्यार्थ्यांपर्यंत समाजातील विविध घटकांसाठी काही लाख कोटींच्या योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. परंतु पत्रकारांसाठी कोणतीच योजना नाही. त्याला घरकुल मिळत नाही. बँकांचे कर्ज देखील मिळत नाही. आधी स्वीकृती दिली जाते, परंतु पत्रकारांची संख्या हजार असेल तर केवळ दहा- वीस जणांना अधिस्वीकृती मिळते. कारण अधिस्वीकृती मिळवण्याचे नियम आणि अटी खूपच जाचक आहेत. खरी अधिस्वीकृतीची गरज असलेले ग्रामीण भागातील पत्रकार त्या अटी- शर्तींची पूर्तता करू शकत नाहीत. यासाठी सरकारने अटी आणि नियम शिथिल करावेत, वर्तमानपत्रांचा खप वाढवा, पत्रकार व वर्तमानपत्रांचे मालक यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी नियमित वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्या वाचकांना 5 हजार रुपयांची आयकरात सवलत द्यावी, गाव तेथे ग्रंथालय या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतच्या वार्षिक आराखड्यात वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपयांचा निधी राखीव ठेवावा. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे पेंडिंग ठेवलेले प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत. जेणेकरून वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ पत्रकारांचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल. यासह पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने महामानव बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी पत्रकार संवाद रॅली काढली आहे. संवाद रॅलीला पत्रकार आणि समाजातील सर्व स्तरातल्या घटकांचा भरभरून असा पाठिंबा व प्रतिसाद मिळत असल्याचे वसंत मुंडे म्हणाले.  
     यावेळी सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रवीण सपकाळे, राज्य समन्वयक संतोष मानुरकर यांच्यासह अकोला जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे, देवानंद गहिले, सम्राट वानखेडे, नागेश भालतिलक, रामजी श्रीवास, अजय सोळंके, जगन्नाथ कोल्हे, लक्ष्मण सपकाळ, सय्यद हसन बाबू यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

     चौकट...
  *विविध स्तरातून पाठिंब्याचे पत्र* 
     दीक्षाभूमी येथून निघालेली पत्रकार संवाद रॅली विदर्भातील विविध जिल्ह्यातून जात आहे. यावेळी पत्रकार रोज आमचे प्रश्न मांडतात. मग ते आज अडचणीत असतील तर आम्हीही त्यांच्या सोबत आहोत, असे म्हणत विविध सामाजिक संघटना, प्रतिष्ठाने संवाद रॅलीला पाठिंब्याचे पत्र देत आहेत. अकोला येथे अंकुर साहित्य संघाच्या वतीने अध्यक्ष हेमंत ढाळे व विष्णू रामचंद्र जोध यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अब्दुल साबीर, बिस्मिल्ला शाह तसेच अकोला येथील शेतकरी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे साहेबराव लांडे, गजानन पालखडे, सुनील खवले उपस्थित होते.
     
*        - - - - - - - - - - - - -

No comments:

Post a Comment