पत्रकारांना सुद्धा आता मतांची ताकद दाखवावी लागेल - वसंत मुंडे
*जळगाव मध्ये साधला पत्रकारांशी संवाद*
जळगाव (प्रतिनिधी):-पत्रकारांचे संरक्षण आणि लोकशाहीचे रक्षण याचा जागर करत नागपूर येथील दीक्षाभूमीतून पत्रकार संवाद यात्रेला प्रारंभ झाला असून 20 ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालया समोर यशवंतराव चव्हाण सभागृहात याचा समारोप होणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारला पत्रकारांचे प्रश्न असतात आणि ते सोडवावे लागतात यासाठी न्याय पद्धतीने मागण्या मांडल्या आहेत. मात्र सरकार अजूनही दखल घ्यायला तयार नसल्यामुळे राज्यात संवाद यात्रा काढावी लागली आहे. समाजाचे प्रश्न सोडवणे हे पत्रकारांचे कामच आहे. परंतु पत्रकारांचे सुद्धा प्रश्न असतात आणि ते सोडवावे लागतात हे जर सरकारला कळत नसेल तर हे प्रश्न सोडवण्यासाठी आता पत्रकारांना सुद्धा आपल्या मतांची ताकद दाखवावी लागेल अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
जळगाव येथील नवी पेठ, स्टेशन रोड वरील हॉटेल सिल्वर पॅलेसच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार संवाद यात्रे संदर्भात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, इलेक्ट्रॉनिक मीडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी, जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, नंदुरबार जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे,मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार परिषदेला संबोधित करताना पुढे यात्रेचे प्रमुख तथा प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले की, संवादामध्ये परिवर्तनाची ताकद आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुक्यातून संवाद साधत त्या त्या जिल्ह्यातील तालुक्यातील समस्यांना सरकार पुढे ठेवण्यासाठी ही संवाद यात्रा काढली आहे. महाराष्ट्रातील ही पहिली संवाद यात्रा आपल्या पाठबळावर ती ऐतिहासिक ठरत आहे. कोरोना काळापासून माध्यमावर मोठे संकट ओढवले आहे. कोरोना काळात शासकीय कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे आरोग्य कवच दिले गेले. परंतु लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील पत्रकारांना घोषणा करून ही आरोग्य कवच दिले गेले नाही, ही मोठी खंत आहे. लोकशाहीतील चार स्तंभापैकी शासन, प्रशासन आणि न्यायव्यवस्था या तीन खांबांना बळकटी दिली जाते. मात्र दुर्दैवाने लोकशाहीला जिवंत ठेवणाऱ्या चौथा स्तंभाला म्हणजेच माध्यमांना सरकार कोणतीही सुविधा देत नाही हेच दुर्भाग्य आहे. यासाठी सरकारला जागे करणे आणि आपल्या मूलभूत प्रश्नांना न्याय हक्काने सोडून घेण्यासाठी पत्रकारांनी एकजुटीने आता एकत्रित येऊन न्याय मागितला पाहिजे. जर लोकशाही टिकवायची असेल तर या चौथ्या स्तंभाला सक्षम करावे लागेल. शासनाला संवेदनशील होऊन पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय द्यावाच लागेल.
पत्रकार हा सर्व तळागाळापर्यंत जाणारा एकमेव घटक आहे. त्याचे महत्त्व आणि ताकद प्रचंड आहे. ती सरकारने ओळखावी अन्यथा पत्रकारांनी आता आपल्या लेखणी बरोबर आपल्या मतांची ताकद सुद्धा दाखवून सरकारला जागे करावे लागेल यासाठीच हा लढा सुरू आहे माध्यम जर कमजोर झाली तर सामान्यांचा आवाज कमजोर होईल लोकशाही संकटात सापडेल.लोकशाही ही व्यवस्था सक्षम राहण्यासाठी आता आपणच पत्रकारांनी जागृत होणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नावर राज्यभर जागर सुरू केला आहे.आता हा जागर प्रश्नांना न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील. दि 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील मंत्रालयावर पत्रकारांचा हा जागर एकजुटीच्या रूपाने सरकारला दिसेल.यासाठी पत्रकारांनी आपले विराट एकजुटीचे दर्शन तमाम पत्रकारांनी मुंबईत उपस्थित राहून दाखवावे.विशेषतः जळगाव येथील पत्रकारांनी सर्वाधिक संख्येने मुंबई येथील पत्रकार संवाद यात्रेच्या समारोपाला उपस्थित राहून सरकारला जागे करण्यासाठी एक कर्तव्य म्हणून सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी केले.या संवाद यात्रेमागे कोणतेही राजकारण नाही. आमचे प्रश्न सुटावेत एवढीच आमची प्रामाणिक भूमिका असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेमध्ये टीव्ही 9 चे प्रतिनिधी किशोर पाटील यांनी पत्रकारांच्या वास्तव वेदना सांगणारी ज्वलंत कविता आपल्या अप्रतिम शब्दातून व्यक्त केली.या पत्रकार परिषदेला पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती हीच एकजुटीची ताकद व्यक्त करत होती.
No comments:
Post a Comment