9 ऑगस्ट रोजी, हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी पृथ्वीराज चव्हाण, सुषमा अंधारे, डॉ. श्रीपाल सबनीस राहणार उपस्थित!
पुणे :- रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी लिहिलेल्या हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या पुस्तकाचे पुण्यातील नामांकित प्रकाशन संस्था यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे यांच्यावतीने द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन केले जाणार आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे, माजी साहित्य संमेलन अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, माजी निवृत्त पोलिस अधिकारी चंद्रशेखर दैठणकर, भानुप्रताप बर्गे, मिलिंद गायकवाड, संगीता पाटील, जान महंमद पठाण, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम, आशिष गांधी, होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटरचे मुख्य संचालक डॉ. अमोल देवळेकर आणि रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यावेळी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
पुण्यातील नवी पेठ येथील प्रसिद्ध पत्रकार भवन येथील कमिन्स सभागृहामध्ये क्रांती दिन 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक साडेअकरा वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यशोदीप पब्लिकेशनच्या प्रकाशक प्रा. रूपाली अवचरे आणि निखिल लंबाते यांनी केले आहे.
हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या 344 पानी पुस्तकाचे लेखन उमेश चव्हाण यांनी केले असून पुस्तकाला प्रस्तावना डॉ. अमोल देवळेकर यांनी दिली आहे. मोफत उपचार कसे मिळवावेत? मोफत उपचारांबाबत शासनाचे आदेश काय आहेत? मा. न्यायालयाची भूमिका काय आहे? लाखो रुपयांचे हॉस्पिटलचे बिल माफ कसे होते? डॉक्टर आणि रुग्णांमध्ये समन्वयाची भूमिका कशा पद्धतीने घेतली पाहिजे? शासकीय योजनांचा नागरिकांना नेमका फायदा कसा करता येईल? निर्धन- गरीब दुर्बल घटकातील नागरिकांना मोठ्या पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार कसे मिळवता येतात? याबद्दल विस्तृत मार्गदर्शन हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या पुस्तकात केले असल्याबद्दलचा समीक्षापर लेख ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी लिहिला आहे. पहिल्या आवृत्तीचे चार वेळा पुनर्मुद्रन व 15 हजार प्रतींच्या विक्री नंतर सुधारित द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन क्रांतीदिनी 9 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रम प्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, ज्येष्ठ साहित्यिक माजी संमेलना अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment