पत्रकारांच्या मागण्या संदर्भात येत्या ८ दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. :- ना. चंद्रकांत दादा पाटील. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 20, 2024

पत्रकारांच्या मागण्या संदर्भात येत्या ८ दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. :- ना. चंद्रकांत दादा पाटील.

पत्रकारांच्या मागण्या संदर्भात येत्या ८ दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. :- ना. चंद्रकांत दादा पाटील. 
मुंबई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सर्व पत्रकारांच्या समस्या पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून तसेच प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या प्रस्ताविकातून मी समजावून घेतल्या आहेत. पुढील ८ दिवसात मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आपल्या सोबत स्वतंत्रपणे बैठक करून त्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दिनांक २८ जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीत पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या दीक्षाभूमी ते मंत्रालय या पत्रकार संवाद यात्रेच्या समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, विधान परिषदेच्या नवनियुक्त आमदार पंकजा मुंडे, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, राज्य समन्वयक संतोष मानूरकर, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, डिजिटल मिडिया प्रमुख सिद्धार्थ भोकरे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, ज्येष्ठ संपादक किसन भाऊ हासे, कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, कोकण विभागीय कार्याध्यक्ष शैलेश पालकर, विदर्भ विभागीय अध्यक्ष नीलेश सोमाणी, अमरावती अध्यक्ष नयन मुंडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुभाष डोके, पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल रहाणे,  छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, प्रसिद्धी समन्वयक भगवान राऊत, राज्य सदस्य संजय फुलसुंदर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
पुढे बोलतांना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, अलीकडच्या काळात माध्यम क्षेत्र हे असंघटित क्षेत्र झाले आहे. मात्र या क्षेत्रातील लोकांसाठी विद्या, वेतन, आरोग्य विमा, पेन्शन, आजारासाठी मदत व त्यांच्या जीवनात स्थैर्य कसे आणतात येईल यासाठी सरकार प्रयत्न करेल. जिल्हा दैनिकांसाठी स्वतंत्रपणे जाहिरात धोरण राबविण्यात येईल तसेच पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची सूचनाही करण्यात येईल. राज्यसभा आणि विधान परिषदेवर जेव्हा पत्रकारांचा प्रतिनिधी घेण्याची तरतूद होईल. तेव्हा त्या विषयावर बोलणे उचित राहील. मात्र वसंत मुंडे यांना पत्रकारांचे नेते आणि पत्रकार म्हणूनही चांगले भवितव्य आहे असे ते म्हणाले.

राज्याचे पर्यटन विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही मला पत्रकार संवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमासाठी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या आज्ञेनुसार मी या कार्यक्रमास आलो असून मी तुमचा निरोप उपमुख्यमंत्र्यांना सांगेल. पत्रकारांनाही या संवाद यात्रेतून नक्कीच न्याय मिळेल. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री मुंबईला आल्यानंतर या संदर्भात बैठक घेऊ असे ते म्हणाले, 

पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या की, दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढल्याबद्दल मी वसंत मुंडे यांचे अभिनंदन करते. त्याचे कारण म्हणजे अशा प्रकारच्या यात्रा फक्त मुंडेंनाच चांगल्या जमतात. गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती. त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले होते. त्यानंतर मी देखील पुन्हा एक संघर्ष यात्रा काढली होती. त्यावेळीही राज्यात सत्ता परिवर्तन झाले होते. आता वसंत मुंडे यांनी पत्रकार संवाद यात्रा काढली आहे. दोन्ही मुंडेंनी काढलेली यात्रा राज्यात सत्ता परिवर्तन घडवून आणणाऱ्या ठरल्या मात्र वसंत मुंडेंनी काढलेली यात्रा आमचं शासन कायम ठेवणारी ठरेल.

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून पत्रकारांच्या सर्व मागण्या मांडल्या. राज्यशासन जर मतांच्या गठ्ठ्यावरच न्याय देण्याच्या भूमिकेत असेल तर एकेक पत्रकार हा मतांचा गठ्ठा आहे. याचा सरकारने विचार करावा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सरकारने आमच्याकडे दयेच्या आणि मायेच्या भूमिकेतून पाहावे अशी विनंती ही त्यांनी केली.  राज्य प्रेस कौन्सिलची निर्मिती करावी, अर्थसंकल्पात पत्रकारांसाठी तरतूद करावी अशा प्रमुख मागण्या त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून केल्या.

राज्य संघटक संजय भोकरे म्हणाले की,  पत्रकार संवाद यात्रा झाली आणि पत्रकार देखील चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो. हे पत्रकारांनी दाखवून दिले. आपली संघटना टिकली पाहिजे. आपण सर्वजण संघटित आहोत हे आज तुम्ही तुमच्या उपस्थितीने सरकारला दाखवून दिले. 

राहुल गिरी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विश्वास आरोटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment