पत्रकार संवाद यात्रेमुळे राज्यात पत्रकारांचा संवाद पूल साधला सदाभाऊ खोत ह्यांचे कौतुकोद्गार; वसंत मुंडे चळवळीतील हाडाचा कार्यकर्ता.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 16, 2024

पत्रकार संवाद यात्रेमुळे राज्यात पत्रकारांचा संवाद पूल साधला सदाभाऊ खोत ह्यांचे कौतुकोद्गार; वसंत मुंडे चळवळीतील हाडाचा कार्यकर्ता..

पत्रकार संवाद यात्रेमुळे राज्यात
 पत्रकारांचा संवाद पूल साधला
सदाभाऊ खोत ह्यांचे कौतुकोद्गार; वसंत मुंडे चळवळीतील हाडाचा कार्यकर्ता..
बत्तीस शिराळा (जि. सांगली), दि. १६ :- ‘‘पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यामध्ये पत्रकारांचा संवाद पूल बांधला गेला आहे,’’ असे कौतुकोद्गार माजी मंत्री व लढवय्ये आमदार सदाभाऊ खोत ह्यांनी आज काढले. ह्या यात्रेचे सूत्रधार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे ह्यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले.

पत्रकारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघाने काढलेली दीक्षाभूमी (नागपूर) ते मंत्रालय (मुंबई) पत्रकार संवाद यात्रा आज दक्षिण महाराष्ट्रात पोहोचली. संघाचे पदाधिकारी व यात्रेत सहभागी झालेले सर्व पत्रकार ह्यांचे बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथे श्री. खोत ह्यांनी स्वागत केले. यात्रेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

शेतकरी-शेतमजूर ह्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही काढलेल्या यात्रांची तुमच्या यात्रेमुळे आठवण झाली, असे सांगून श्री. खोत म्हणाले, ‘‘एवढ्या मोठ्या पल्ल्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच यात्रा असावी. या माध्यमातून राज्यातील पत्रकारांमध्ये संवादाचा पूल बांधला गेला, हे मला तिचे सर्वांत मोठे यश वाटते. ही एक चळवळ आहे. ह्या चळवळीचा पुढचा प्रवास अशा पुलामुळे सहज आणि सोपा होतो. वसंत मुंडे ह्यांच्यासारख्या हाडाच्या कार्यकर्त्याबरोबर राज्यातील पत्रकारांनी राहावं, त्यांना साथ द्यावी, असं मी नक्कीच सांगीन.’’

पत्रकार म्हणजे गावगाड्यातील हेरच होत. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळातही हेरखाते होते. बहिर्जी नाईक आणि त्यांचे सहकारी हे काम करीत. हेरमंडळी राज्याचे डोळे असतात. राज्यात काय चालले आहे, हे ते राजाला दाखवून देतात, असे सांगून श्री. खोत म्हणाले की, अशा आधुनिक हेरखात्यावर सरकारने मायेची पाखर घालावी, मदतीचा हात द्यावा, ही माझी अपेक्षा आहे.

प्रदेशाध्यक्ष मुंडे ह्यांच्याशी पत्रकारितेच्या पलीकडचे नाते असल्याची आठवण करून देत श्री. खोत म्हणाले, ‘‘आमचे नाते चळवळीचे, गावगाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरचे आहे. शरद जोशीसाहेबांच्या चळवळीच्या निमित्ताने आमचे संबंध आले. वसंतराव हाडाचा कार्यकर्ता, गावगाड्यातला कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची त्यांना जाण आहे. अशा चांगल्या माणसाबरोबर खऱ्या अर्थानं पत्रकारांनी राहायला पाहिजे.’’

पत्रकारांना राज्य सरकारने जपले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना श्री. खोत म्हणाले की, कोणतीही व्यवस्था निश्चितच परिपूर्ण असत नाही. परंतु कमीत कमी दोष ठेवून चांगल्या व्यवस्थेकडे आपल्याला जायचे आहे. प्रत्येक व्यवस्थेमध्ये दोष असतातच. कचरा पडलेले पाणी आपण गाळून घेतो, त्याच पद्धतीने प्रत्येक व्यवस्थेमधील दोष गाळून पुढे जावे लागेल.

No comments:

Post a Comment