तुमच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील
धैर्यशील कदम ह्यांचे पत्रकार संवाद यात्रेला ठोस आश्वासन..
उंब्रज (जि. सातारा), (प्रतिनिधी) : ग्रामीण महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सर्व मागण्या रास्त आहेत. त्या मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांच्यापर्यंत नक्की पोहोचविन. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस धैर्यशील कदम ह्यांनी शनिवारी (दि. १७) उंब्रज येथील पत्रकार संवाद कार्यक्रमात हे ठोस आश्वासन दिले.
पत्रकार संवाद यात्रेतर्फे उंब्रज येथे ‘पत्रकार संवाद’ कार्यक्रम झाला. त्यात बोलताना श्री. कदम म्हणाले की, उभे आयुष्य पत्रकारितेमध्ये घालविणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना आर्थिक स्थैर्य किंवा सुरक्षितता मिळत नाही. त्यांनी केलेल्या कामाबद्दल केवळ शाब्दिक कौतुक करून त्यांचे पोट भरत नाही. म्हणूनच त्यांना सरकारकडून योजनांद्वारे आधार मिळाला पाहिजे.
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे ह्यांचे कौतुक करताना श्री. कदम म्हणाले की, पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांच्या मागण्यांना वाचा फोडली आहे. ह्या यात्रेला १०० टक्के यश मिळणार.
पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे ह्यांनी संवाद यात्रेची वाटचाल व राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे ह्यांनी समारोपाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे, आरोग्य सेलचे प्रमुख डॉ. अमित खाडे, महेशकुमार जाधव, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, कमलाकर पाटील, विशाल भोसले, विलासराव आटोळे, वैशाली मांढरे आदी उपस्थित होते.
पत्रकार संवाद यात्रेत शनिवारी उंब्रज येथे पत्रकारांशी संवाद कार्यक्रम झाला. त्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिणीस धैर्यशील कदम ह्यांनी संवाद साधला. कार्यक्रमास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे, अन्य पदाधिकारी प्रवीण कांबळे, डॉ. अमित खाडे, महेशकुमार जाधव, सहायक पलीस निरीक्षक रवींद्र भोरे आदी उपस्थित होते.
..............
No comments:
Post a Comment