महाविद्यालये आणि आयटीआय संस्थांमध्ये वर्तमानपत्र खरेदीसाठी तरतूद करणारमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा यांची घोषणा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, August 25, 2024

महाविद्यालये आणि आयटीआय संस्थांमध्ये वर्तमानपत्र खरेदीसाठी तरतूद करणारमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा यांची घोषणा..

महाविद्यालये आणि आयटीआय संस्थांमध्ये वर्तमानपत्र खरेदीसाठी तरतूद करणार
मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा यांची घोषणा..
मुंबई (प्रतिनिधी):- उच्चतंत्र शिक्षण विभागाच्या सहा हजार महाविद्यालयांमध्ये स्थानिक पातळीवरील वर्तमानपत्रे नियमीत खरेदी करण्यासाठी निधीची तरतूद कशी करता येईल? याचा विचार करून सचिवांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. अशी ग्वाही उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तर कौशल्य विकास विभागाच्या पाचशे संस्थांमध्येही स्थानिक वर्तमानपत्रे नियमीत घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दोन महिन्याच्या आत निर्णय घेण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. तर मागणीप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीत वार्षिक आराखड्यात स्थानिक वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी दहा हजार रूपयाची तरतूद करण्याबाबतही सरकार निर्णय घेईल अशी ग्वाही दोन्ही मंत्र्यांनी दिली.
दिक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमास छोट्या वर्तमानपत्राच्या एकूण आर्थिक परिस्थितीवर वसंत मुंडे यांनी भूमिका मांडल्यानंतर सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी छोट्या वर्तमानपत्रांचे महत्व मोठे आहे. मात्र या वर्तमानपत्रांकडे दुर्लक्ष होतेय हे मान्य करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून राज्यस्तरावरील वर्तमानपत्रांच्या आणि माध्यम क्षेत्रातील प्रमुख मागण्या तात्काळ मान्य केल्या जातील. ग्रामपंचायतींना वार्षिक आराखड्यात स्थानिक वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी दहा हजार रूपयाची तरतूद करण्याची मागणी मंजूर केली जाईल. असे सांगतानाच उच्चतंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सहा हजार महाविद्यालयांमध्ये स्थानिक वर्तमानपत्रे नियमीत खरेदी करण्यासाठी धोरण ठरवले जाईल. निधी विद्यापीठ स्तरावरून द्यायचा? की सरकारच्या नियमीत निधीमधून द्यायचा? याबाबत सचिवांशी चर्चा करून आगामी काही दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल. अशी ग्वाही पाटील यांनी दिली. तर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही राज्यातील पाचशे आयटीआय संस्थांमध्ये नियमीत वर्तमानपत्रे खरेदी करण्याबाबत येत्या दोन महिन्यात निधीची तरतूद करून या वर्तमानपत्रांना कायमस्वरूपी घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल. अशी घोषणा केली. छोट्या वर्तमानपत्रांना आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी वसंत मुंडे यांनी सुरू केलेली चळवळ महत्वाची असुन गावपातळीवरील छोटी वृत्तपत्र आणि पत्रकार खर्‍या अर्थाने लोकशाहीमध्ये महत्वाचा घटक असल्याचेही दोन्ही मान्यवरांनी स्पष्ट करून छोट्या वृत्तपत्रांना अधिक मदत करण्याची भूमिका सरकार घेईल असे स्पष्ट केले. यावेळी वसंत मुंडे यांनी वृत्तपत्र व्यवसाय आणि काम करणारे पत्रकार यांच्यापुढे निर्माण झालेल्या आर्थिक समस्या प्रभावीपणे मांडल्या. त्यामुळे सरकारसमोर छोट्या वर्तमानपत्र आणि पत्रकारांच्या समस्या पोहोचल्या असल्याचे या समारोपाच्या कार्यक्रमातून समोर आले.

No comments:

Post a Comment