सामान्य पत्रकारांकडेही मतांचे गठ्ठे याचा विचार करावा-वसंत मुंडे--पत्रकार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा शिर्डी येथे समारोप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 3, 2024

सामान्य पत्रकारांकडेही मतांचे गठ्ठे याचा विचार करावा-वसंत मुंडे--पत्रकार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा शिर्डी येथे समारोप..

सामान्य पत्रकारांकडेही मतांचे गठ्ठे याचा विचार करावा-वसंत मुंडे
पत्रकार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा शिर्डी येथे समारोप
शिर्डी (प्रतिनिधी):- पत्रकार समाजाच्या प्रश्‍नांसाठी व्यवस्थेशी झगडत राहतो. आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो. मात्र  आता न्याय मागण्यासाठी महाराष्ट्रातील पत्रकारांचा एकत्रित बुलंद आवाज होत आहे. सरकारने संवेदनशील होऊन पत्रकारांना न्याय द्यावा. पत्रकारांकडे लेखणीसोबतच मतांची ताकद आहे याचा विचार करावा लागेल. एका विधानसभा मतदारसंघात संघात सक्रिय वीस पत्रकारांकडे वैयक्तीक पातळीवर प्रत्येकी पाचशे मते देण्याची शक्ती आहे. तर राज्यात तीस लाख मतांचा गठ्ठा होईल. मग या सामान्य पत्रकारांच्या मतांकडे कोणी बघणार की नाही? पत्रकारांच्या मतांची गरज आहे की नाही? असा प्रश्‍न करत सरकारने पत्रकारांच्या मागण्यांसाठी तात्काळ निर्णय घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रमुख वसंत मुंडे यांनी केले.
शिर्डी येथे 2 ऑगस्ट 2024 रोजी दीक्षाभूमी ते नागपूर पत्रकार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप झाला. नागपूर येथून 28 जुलै रोजी सुरू झालेली यात्रा वर्धा, अमरावती, अकोला, धुळे,जळगाव, शेगाव या मार्गे श्रीक्षेत्र शिर्डी येथे 2 ऑगस्ट रोजी दाखल झाली. यावेळी स्थानिक पत्रकारांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री वसंतराव मुंडे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, मुंबई विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, नगर जिल्हाध्यक्ष दत्ता घाडगे व सोमनाथ काळे उपस्थित होते. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबईचे संस्थापक अध्यक्ष किसन भाऊ हासे व मनसेच्या पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दिला. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले की, साई बाबांनी श्रद्धा आणि सबुरीची शिकवण जगाला दिली. अशा संत नगरीत यात्रा आली आहे. संवाद यात्रेला सुरूवात झाली तेव्हा थोडी सांशकता होती. मात्र नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव, जळगाव, धुळे ते शिर्डी या प्रवासा दरम्यान विविध तालुके, छोटी-छोटी गावे याठिकाणी पत्रकारांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले. विविध लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे नेते, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, सामान्य जनता यांनी संवाद यात्रेत सहभागी होवून जाहीर पाठिंबा दिला. ठिकठिकाणी पत्रकारांशी संवाद करताना अनेक समस्या नव्याने समोर आल्या. आम्ही सुरूवातीला वीस प्रमुख मागण्या घेवून निघालो होतो मात्र आता मुंबईपर्यंत जाताना मागण्यांची संख्या वाढत जाईल. याचाच अर्थ पत्रकारांच्या समस्या होत्या आणि आहेत. केवळ या समस्यांना वाचा कोणी फोडायची? जगाचे प्रश्‍न मांडणार्‍या पत्रकारांना आपलेच प्रश्‍न कुणापुढे मांडावेत? हा प्रश्‍न पडला होता. हे वास्तव या संवाद यात्रेत समोर येत आहे. संविधानिक मार्गाने सरकारकडे न्याय हक्काच्या मागण्या मागितल्या. काही मागण्यांना सरकारने न्याय दिला, पण जाचक अटी टाकल्या. यामुळे त्या योजनांचा लाभ गरजवंत पत्रकारांना होत नाही. पत्रकारांना अधीस्वीकृती सहज मिळावी आणि ज्येष्ठ पत्रकारांना वयाच्या साठ वर्षे होताच तात्काळ शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे सन्मान पेन्शन योजनेचा लाभ मिळावा. सरकार विविध घटकांना न मागता योजना देत आहे. त्यामुळे सरकारने पत्रकारांसाठीसुध्दा न्याय भूमिकेतून मागण्या मंजूर करून निर्णय घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केले. पत्रकारांकडे लेखणी बरोबरच मतांचीही शक्ती आहे याचा विचार सरकारला आता करावा लागेल. स्थानिक पातळीवरील पत्रकारांनी वैयक्तीक व संपर्कातील मतदार एकत्रीत केले तर एका पत्रकाराकडे सहजपणे पाचशे मते होवू शकतात. एका मतदारसंघात वीस पत्रकारांनी एकत्रीत निर्णय घेतला तर दहा हजाराचा गठ्ठा होतो, तेच राज्यपातळीवर विचार केला तर तीस लाख मते एकत्रीत होतील. मग ही मत पाहिजेत का नाही? हे सांगण्याची वेळ आली आहे. पत्रकारांना राजकीय भूमिका घ्यायची नाही, तो पिंडही नाही. मात्र न्याय हक्कासाठी आमच्याकडे असलेल्या मतांचे दर्शन सरकारला घडवावे लागेल. यासाठी पत्रकारांनी एकत्रितपणे आपल्या मतांचे सरकारला ठणकावून सांगावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे यांनी ही संवाद यात्रा वंचित पीडित अन्यायग्रस्त पत्रकारांचा आवाज बुलंद करण्यासाठी जागर करत आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दोन वेळा संपादक मुख्यमंत्री लाभले आहेत. यापूर्वी उध्दव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदेही वर्तमानपत्राचे मालक संपादक आहेत. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्‍नांना न्याय मिळेल अशी आशा आहे. वसंत मुंडे यांच्याकडे नेतृत्व दातृत्व आणि कर्तुत्व असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकारांना न्याय मिळेल असा विश्‍वासही आरोटे यांनी व्यक्त केला. तर कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी म्हणाले, पत्रकारांच्या प्रश्‍नांची जाण असलेले नेतृत्व वसंत मुंडे यांच्या रूपाने मिळाले आहे. पत्रकारांना देखील प्रश्‍न असतात आणि ते सोडवावे लागतात ही भूमिका आता पत्रकारांसह जनसामान्यांना देखील मान्य झाली आहे. हेच संवाद यात्रेचे पहिले यश आहे. त्यामुळे आता ही यात्रा पत्रकारांना न्याय देवूनच थांबेल. असे स्पष्ट केले. प्रास्ताविक उत्तर विभागीय सचिव अनिल रहाणे यांनी केले. तर सूत्रसंचालन दत्ता घाडगे यांनी केले. आभार प्रसिद्धी प्रमुख भीमराव वाकचौरे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठी विविध संघटनांनी एकत्र यावे-किसन भाऊ हासे
इतिहासात पहिल्यांदाच वसंत मुंडेंच्या नेतृत्वाखाली वृत्तपत्र आणि पत्रकारांच्या प्रश्‍नांवर पत्रकार संवाद यात्रा निघाली आहे. या यात्रेतून माध्यमक्षेत्रातील सर्व घटकांचे प्रश्‍न अधोरेखीत होत आहेत. त्यामुळे सर्व पत्रकार संघटनांनी एकत्रीत येवून पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठी सरकारसमोर आपल्या शक्तीचे दर्शन देत प्रश्‍न सोडवून घ्यावेत असे आवाहन करून संपादक पत्रकार सेवा संघटनेचा पाठींबा संस्थापक अध्यक्ष किसनभाऊ हासे यांनी जाहिर केला.

No comments:

Post a Comment