लढतो आणि भिडतो तोच पत्रकार असतो - वसंत मुंडे..
बीड/येरमाळा:-‘लढण्याची आणि थेट भिडण्याची क्षमता असणारी व्यक्तीच पत्रकार होते,’ असे #महाराष्ट्र_राज्य_पत्रकार_संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी बुधवारी (दि. १४) बीड येथे स्पष्ट केले. ‘राज्यात पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांची किमान पाच लाखांची मतपेढी आहे. त्यांची मते फिरविण्याची क्षमताही लक्षात घ्या,’ असेही मुंडे यांनी सूचकपणे सांगितले.
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दीक्षाभूमी (नागपूर) ते मंत्रालय (मुंबई) अशी चार हजार किलोमीटरची पत्रकार संवाद यात्रा सुरू आहे. #महाराष्ट्र_राज्य_पत्रकार_संघटनेच्या या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू आहे. यात्रेत बुधवारी बीड व येरमाळा (जि. धाराशिव) येथे पत्रकारांशी संवाद साधण्यात आला.
बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमात श्री. वसंत मुंडे म्हणाले, ‘‘आम्ही ठरवले, तर काय करू शकतो हे दाखवून देण्याची वेळ सरकारने कृपया आणू नये. कोणत्या सरकारने कोणत्या अर्थसंकल्पामध्ये पत्रकारांसाठी एका नव्या पैशाची तरी तरतूद केली का, हे सांगावे. या क्षेत्रात चाललेली वेठबिगारी पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही.’’
ग्रामीण माध्यमव्यवस्था सक्षम करण्यासाठीच यात्रा
येरमाळा येथे विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पत्रकार संवाद मेळावा झाला. श्री. वसंत मुंडे म्हणाले की, ग्रामीण भागात राहून माध्यमांसाठी काम करणाऱ्यांना कोणत्याच सोयी-सवलती मिळत नाहीत. ही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठीच पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आली आहे.
न्याय मिळत नाही, म्हणून सर्वसामान्य माणूस पत्रकारांकडे येतो. त्यातील अनेक प्रश्न सुटतात. याच पत्रकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रश्न सुटणार नसतील तर पत्रकारांना मतांची ताकद दाखवावी लागेल असा इशाराही श्री. मुंडे यांनी दिला.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे कळंब तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, बाळासाहेब जाधवर, सचिन बारकुल, दत्ता बारकुल, दीपक बारकुल, सचिन पाटील, संतोष बारकुल, सुधीर लोमटे, तानाजी बारकुल आदी उपस्थित होते. येडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन पत्रकार संवाद यात्रा तुळजापूर येथे रवाना झाली.
No comments:
Post a Comment