वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण त्रास देणाऱ्या दुचाकी टुकारांना 'दणका'..!
*टी सी कॉलेज परिसरातील बेशिस्त वाहन चालकांवर बारामती वाहतूक शाखेची जोरदार कारवाई.._टी. सी. परिसरातील ८४ प्रकरणातून ७० हजार ५०० रुपयांची दांडात्मक कारवाई..
बारामती:- बारामती शहरातील नामांकित असलेल्या तूळजाराम चतुरचंद महाविद्यालय परिसरात अनेक टुकार मुलांकडून बेशिस्तपणे दुचाक्या चालवून अनेकांना त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत.याबाबत वाहतुक शाखेकडे अनेक तक्रारी प्राप्त होत्या त्याअनुषंगाने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
चतुरचंद महाविद्यालय परिसरात मुला-मुलींची मोठया प्रमाणात रहदारी असते.त्या ठिकाणी मोक्कार विनाकारण फिरणाऱ्या टुकार तरुणांकडून बुलेट गाड्यांचे सायलेंसर काढून मोठा फटाका आवाज काढण्याचे प्रकार घडत असल्याबाबत वाहतुक शाखेकडे अनेक तक्रारी प्राप्त होत्या.यावर ठोस कारवाई म्हणुन पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेतील वाहतुक अंमलदार यांच्यासह आज दि.१४ रोजी सकाळी १० ते १. ३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अशा हुल्लडबाजांवर मोटार वाहन कायद्यांखाली वेगवेगळ्या कलमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये विना परवाना वाहन चालवणे सहा प्रकरणे ३० हजार दंड, वाहन चालक परवाना न बाळगणे ४६ प्रकरणे २३ हजार दंड,फॅन्सी व खराब नंबर प्लेटबाबत ११ प्रकरणे ५ हजार ५०० दंड, ट्रिपल सीट १० प्रकरणे १० हजार दंड, काळी काच १ प्रकरण ५०० दंड अशा व इतर मोटार वाहन कायद्याखाली वेगवेगळ्या कलमानुसार एकूण ८४ प्रकरणातून ७० हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केली असून या कारवाईत बारामती वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार प्रशांत चव्हाण, सुभाष काळे, पोलीस हवालदार प्रदीप काळे, महिला पोलीस हवालदार स्वाती काजळे, रूपाली जमदाडे, सीमा साबळे, माया निगडे, सविता धुमाळ, रेश्मा काळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य कदम व प्रज्योत चव्हाण आदी सहभागी झाले होते.
*...अन्यथा कडक कारवाई करणार..!*
'बारामती शहरातील कोणत्याही महाविद्यालय परिसरात विनाकारण वाहने फिरवून कुणी दहशत-दादागिरी करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधीतांवर कडक कारवाई करण्यात येईल. वाहने चालवताना कुणीही कायद्याचे उल्लंघन करू नये. विशेषत: महिला-मुलींना गाड्यांचे आवाज काढून, वेडीवाकडी वाहने चालवून त्रास देण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तात्काळ वाहतुक पोलीसांना कळवावे.'
~चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक
No comments:
Post a Comment