छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी यापुढे एक कोटींचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
*२३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन*
बारामती, दि.१५: गणेश वंदना, ढोलताशा पथक, 'लेझर शो', महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकसंगीत, लक्ष्यवेधी हीप हॉप नृत्य फटाक्यांची आतषबाजी आणि प्रेक्षकांनी भरगच्च भरलेले मैदान अशा अतिशय दिमाखदार, जोशपूर्ण व क्रीडामय वातावरणात २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आणि स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांच्या आयोजनाकरीता राज्य शासनाकडून ७५ लाख रुपयाचा निधी देण्यात येतो; खेळाडूंना चांगल्यापद्धतीने खेळ खेळता यावा, खेळाडूंना सर्व प्रकारच्या दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरीता यापुढे या स्पर्धांच्या आयोजनकरीता राज्यशासनातर्फे १ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह बाबुराव चांदोरे, पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रतिनिधी, क्रीडाप्रेमी यावेळी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत, असे सांगून श्री. पवार म्हणाले, कुठलाही खेळ हा महत्वाचा आहे, कोणताही खेळ हा खिळाडूवृत्तीने खेळला गेला पाहिजे प्रत्येकाच्या अंगात खिळाडूवृत्ती असली पाहिजे. यावर्षीच्या स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध खेळाडू सहभागी झाले आहेत, या स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या खेळाडूंना 45 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहे, चांगल्या खेळाडूंचा सहभाग, भरीव आर्थिक तरतूद, बक्षिसांची मोठी रक्कम, बारामतीतील अनुकूल वातावरण, क्रीडा रसिकांचा भक्कम पाठिंबा याबळावर ही स्पर्धा यशस्वी होईल, क्रीडारसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडण्याचे काम खेळाडू करतील. देशी खेळाची लोकप्रियता वाढविण्याकरीता प्रयत्न करण्यात येत असून, क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्याचे काम राज्यशासनाच्यावतीने करण्यात येत आहे, आगामी काळात क्रीडा विभागाला अधिकचा निधी देण्यात येईल. यामुळे देशी खेळांच्या प्रचार-प्रसार आणि खेळाडूंच्या विकासाला अधिक बळ मिळणार आहे.
वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असणारी बारामतीत छत्रपती शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या बारामतीत खो-खो, कबड्डी, क्रिकेट या स्पर्धासह मॅरेथॉन या सारख्या स्पर्धा होत असतात. यावर्षीच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजनाची संधी बारामती तालुक्याला मिळाली आहे. बारामतीचा चेहरा मोहरा बदल्याचे काम करतांना गावाचे गावपण टिकवून येथील नागरिकांचे राहणीमान अधिक उंचविण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहे. याकरीत बारामती सुदंर, स्मार्ट करण्याकरीता नागरिकांनी साथ दिली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही श्री. पवार म्हणाले.
*शिवछत्रपतींच्या नावाने असलेल्या क्रीडा पुरस्काराचे वितरण लवकरात लवकर करण्यात येईल- क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे*
क्रीडामंत्री श्री. भरणे म्हणाले, खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळावी याकरीता छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सन 2012 पासून आयोजित करण्यात येते. बारामती येथे आयोजित स्पर्धेत 16 महिला व 16 पुरुष असे एकूण 32 संघ आणि 600 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू निर्माण होतील.
राज्यातील ग्रामीण भागात कबड्डी आणि कुस्ती खेळ प्रचंड लोकप्रिय आहे. ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना प्रेरणा देणारी ही स्पर्धा आहे. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे दर्जेदार खेळ बघण्याची संधी आपल्या प्राप्त झाली असून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले.
नवी दिल्ली येथे आयोजित जागतिक खो-खो स्पर्धेकरीता राज्यशासनाच्यावतीने 10 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. खेळाडूंच्या कामगिरीनुसार अ गट 37, ब गट 45, क गट 34 आणि ड गटात 33 असे 149 खेळाडूंना थेट शासकीय नोकरीत नियुक्ती देण्यात आली असून त्यांना लवकरच पदभार दिला जाईल. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेत्या, सहभागी खेळाडूंचा गौरव करण्यात येत आहे, यामुळे खेळाडूंच्या पाठीमागे राज्यशासन भक्कमपणे उभे आहे. आगामी काळातही याप्रमाणेच खेळाडूंना सहकार्य करण्यात येईल. शिवछत्रपतींच्या नावाने असलेल्या क्रीडा पुरस्काराचे वितरण लवकरात लवकर करण्यात येईल, असेही श्री. भरणे म्हणाले.
श्रीमती मुंडे म्हणाल्या, खेळाडूंच्याअंगी असलेली शिस्त आपल्या अंगातही असली पाहिजे. कबड्डी खेळ हा सांघिक खेळ असून एकमेकाला साथ देवून खेळ खेळला जातो. या खेळातून खूप शिकण्यासारखे आहे. खेळाडूंनी खेळ खेळतांना विजयी संघांनी बक्षिसे स्वीकारावीत आणि पराभूत संघांनी नम्रपणे पराभव स्वीकारावा. पराभूत खेळाडू, संघ यांनी निराश न होता यामधून धडा घ्यावा, असे श्रीमती मुंडे म्हणाल्या.
श्री. चांदोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन श्री. कसगावडे यांनी केले.
No comments:
Post a Comment